भेसळविरोधी कारवाईचा दूध व्यवसायावर परिणाम : राज्यातील दूधसंकलनात २५ टक्क्यांची घट

- भंडाऱ्यात दररोज सुमारे ५०० लिटर कमी संकलन; पावसाळ्याचाही उत्पादनावर परिणाम, मात्र टंचाई नाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : राज्यभर भेसळयुक्त दुधाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या धडक कारवाईचा परिणाम आता दूध व्यवसायावर दिसून येत आहे. राज्यातील दूधसंकलनात सुमारे २५ टक्क्यांनी घट झाल्याचे चित्र असून, भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत. भंडारा जिल्ह्यातही दुधाच्या संकलनात दररोज सुमारे ५०० लिटरची घट जाणवत आहे. मात्र, जिल्ह्यात सध्या दुधाचा पुरवठा आणि मागणी संतुलित असल्याने टंचाईची परिस्थिती नसल्याचे जिल्हा दुग्ध संघाने स्पष्ट केले आहे.
गेल्या महिनाभरात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू केल्या आहेत. या कठोर तपासण्यांमुळे भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर पावसाळी हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदाही दूध उत्पादनात घट झाल्याने संकलनावर परिणाम झाला आहे. बाहेरील भागातून होणाऱ्या दुधाच्या पुरवठ्यावरही किरकोळ परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
भंडारा जिल्ह्यात जिल्हा दुग्ध संघाच्या माध्यमातून ग्रामीण दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी २०० दूध संकलन केंद्रे कार्यरत आहेत. याशिवाय खासगी डेअऱ्या आणि अनेक पशुपालक थेट ग्राहकांना दूध विक्री करतात. या व्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली असून, शासनाच्या पशुसंवर्धन योजनांमुळे दुधाळ जनावरांची संख्या टिकून राहण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्यातील २०० संकलन केंद्रांमधून दररोज सुमारे ३० हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. स्थानिक पातळीवर संकलनात काही प्रमाणात घट झाली असली, तरी ग्राहकांना नियमित दूधपुरवठा सुरू आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात दुधाची कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही.
दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या कारवायांमुळे ग्राहकांमध्ये दुधाच्या गुणवत्तेबाबत चिंता वाढली आहे. आतापर्यंत वापरले जाणारे दूध शुद्ध होते की भेसळयुक्त, असा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे पॅकेटबंद तसेच खुल्या स्वरूपातील दूध खरेदी करताना अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, कृत्रिम दूध तयार करण्यासाठी डिटर्जंट, युरिया आणि विविध रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. अशा भेसळयुक्त दुधाचे सातत्याने सेवन केल्यास पोटाचे विकार, यकृत आणि मूत्रपिंडाचे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे ग्राहकांनी विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच दूध खरेदी करावे आणि संशयास्पद दूध आढळल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा दुग्ध संघाचे व्यवस्थापक प्रवीण गि-हेपूंजे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील २०० संकलन केंद्रांमधून दररोज सुमारे ३० हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. अनेक पशुपालक थेट घरोघरी दूध विक्री करतात. पावसाळी हंगामात दरवर्षी दूध उत्पादनात घट होते. मात्र, सध्या जिल्ह्यात दुधाची कोणतीही टंचाई नसून ग्राहकांना नियमित पुरवठा सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




