महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूरच्या विकासाला नवी गती : ऊर्जा विभागाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर सकारात्मक चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध प्रलंबित विषयांवर आज मुंबई येथील एमएसआरडीसी (MSRDC) कार्यालयात माननीय ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील वीज, औद्योगिक, आरोग्य तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून विविध प्रस्तावांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील १ हजार ७४० कृषी पंपांना तातडीने वीजजोडणी देण्याचा मुद्दा प्राधान्याने उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने पुढील १० दिवसांत तांत्रिक तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित विभागाकडून देण्यात आले.

याशिवाय बल्लारपूर येथे ईएसआयसी (ESIC) रुग्णालय, एसआरपीएफ (SRPF) वसाहत तसेच महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी विसापूर येथील ३१.३५ हेक्टर बंद पडलेल्या पॉवर हाऊसची जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या प्रस्तावामुळे परिसरातील आरोग्य सुविधा, औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

स्वतंत्र विदर्भ क्षेत्र वीज प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी करण्यात आलेल्या ₹५५० कोटींच्या तरतुदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही समिती सखोल अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे.

दरम्यान, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ८०० मेगावॅट क्षमतेचा संच कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आला असून तो लवकरच मंजुरीच्या प्रक्रियेत मार्गी लागेल, अशी सकारात्मक माहिती ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

बैठकीत महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीतील पायाभूत सुविधांच्या विकासावरही भर देण्यात आला. वसाहतीतील रस्ते, नाल्या, निवासस्थाने, गाळे तसेच स्विमिंग पूल आणि जिमसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. वसाहतीतील ५३० इमारतींपैकी १४३ इमारतींचे नूतनीकरण पूर्ण झाले असून उर्वरित इमारतींची दुरुस्ती आणि नूतनीकरणाची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून विकासकामांना अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





  Print






News - Rajy




Related Photos