सेवा महोत्सव २०२६ : सांस्कृतिक महोत्सवातून संस्कृतीचा जागर; कारगिल वीरांना मानवंदना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा महोत्सव २०२६ अंतर्गत सहाव्या दिवशी सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे भव्य सांस्कृतिक महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्कृतीचा उत्सव शौर्याला मानवंदना! या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक सादरीकरणांनी झाली. पुण्याचे प्रसिद्ध गायक राजेश दातार आणि प्रज्ञा देशपांडे यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
यावेळी भारुड, गोंधळ, कोळीगीत, जोगवा, धार्मिक नृत्य, देशभक्तीपर गीत तसेच महापुरुषांच्या जीवनगाथेवर आधारित प्रभावी नृत्याविष्कार सादर करण्यात आले. विविध कलाप्रकारांमधून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि देशभक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. या बहारदार सादरीकरणांमुळे संपूर्ण सभागृह संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रभक्तीच्या रंगांनी भारावून गेले.
कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित माजी सैनिकांचा सन्मान सोहळा होय. देशाच्या संरक्षणासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेला यावेळी उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली. वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना देशसेवेची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला.
संस्कृतीचे जतन, देशभक्तीची भावना दृढ करणे आणि वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे या त्रिसूत्रीचा प्रभावी संदेश देणारा हा सांस्कृतिक महोत्सव नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरला. सेवा महोत्सव २०२६ अंतर्गत आयोजित विविध उपक्रमांपैकी या कार्यक्रमाने विशेष लक्ष वेधून घेतले.
News - Gadchiroli




Petrol Price




