महत्वाच्या बातम्या

 बारामतीत चंद्रपूरचा झेंडा फडकला : राज्यस्तरीय मॅरेथॉन स्केटिंग स्पर्धेत अधीर जुन्नावारचे सुवर्ण यश


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे मॅरेथॉन स्केटिंग असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्केटिंग स्पर्धेत चंद्रपूरच्या चिमुकल्या स्केटर अधीर जुन्नावार याने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अंडर-६ वयोगटातील १ किलोमीटर इनलाईन मॅरेथॉन शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावत अधीरने चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या गुणवंत स्केटर्समध्ये झालेल्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत अधीरने सुरुवातीपासूनच वेग, संतुलन आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. अखेरपर्यंत आघाडी कायम राखत त्याने सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि सुवर्णपदकावर कब्जा केला. त्याच्या प्रभावी कामगिरीने उपस्थित प्रेक्षक, पंच आणि स्पर्धकांचीही दाद मिळवली.

मॅरेथॉन स्केटिंग ही केवळ वेगाची नव्हे, तर सहनशक्ती, मानसिक तयारी, संतुलन आणि सातत्यपूर्ण सरावाची कठीण परीक्षा मानली जाते. अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेत लहान वयात अधीरने दाखविलेली जिद्द आणि चिकाटी विशेष कौतुकास्पद ठरली.

स्पर्धेच्या समारोपावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते महेश देवकते यांच्या हस्ते अधीर जुन्नावार याला सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. या यशामुळे चंद्रपूरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अधीरच्या या यशामागे प्रशिक्षक विनोद निखाडे यांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचा मोठा वाटा असल्याचे मान्यवरांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधीरने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधत राज्यस्तरावर आपली छाप उमटविली आहे.

अधीर जुन्नावारच्या या दिमाखदार यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी त्याचे तसेच प्रशिक्षक विनोद निखाडे यांचे अभिनंदन केले. भविष्यात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधीर अशीच उल्लेखनीय कामगिरी करून चंद्रपूर आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





  Print






News - Chandrapur




Related Photos