महत्वाच्या बातम्या

 मतदार यादी पुनरिक्षणात तई खुर्दची शंभर टक्के कामगिरी : जिल्ह्यात ठरले आदर्श गाव


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तई खुर्द गावाने गणना प्रपत्र संकलन, डिजिटायझेशन आणि प्रमाणीकरणाची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

गावातील एकूण ३२२ मतदारांपैकी २९३ मतदारांची गणना प्रपत्रे भरून त्यांचे डिजिटायझेशन व प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले. उर्वरित २९ मतदार मार्क्ड नॉन-कलेक्टेबल असल्याने पात्र मतदारांच्या संदर्भातील काम शंभर टक्के पूर्ण झाले. तसेच एकही गणना प्रपत्र वितरण किंवा डिजिटायझेशनसाठी प्रलंबित नसल्याची नोंद करण्यात आली आहे.

उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार वैभव पवार यांच्या नियोजनातून आणि बीएलओ अरुण ब्राह्मणकर यांच्या अथक परिश्रमांमुळे ही कामगिरी शक्य झाली. घराघरांत जाऊन मतदारांशी संपर्क साधणे, गणना प्रपत्रांचे वितरण, पडताळणी, डिजिटायझेशन आणि प्रमाणीकरण ही संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशासनाने संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि बीएलओ यांचे अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी जिल्ह्यातील इतर गावांनीही तई खुर्दच्या कार्यपद्धतीचा आदर्श घेऊन मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos