संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे सीबीएसई क्लस्टर-IX व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे आयोजित सीबीएसई क्लस्टर-IX व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा आज उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली तसेच दमण दीव येथील विविध सीबीएसई संलग्न शाळांमधून सुमारे ६०० विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत प्रशिक्षक, व्यवस्थापक, दिल्लीहून आलेली सीबीएसई अधिकृत टीम, तसेच सीबीएसई निरीक्षक मुकुंद झाला उपस्थित आहेत. ही स्पर्धा सीबीएसईच्या क्रीडा दिनदर्शिकेनुसार आयोजित करण्यात आली आहे.
उद्घाटन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून वरोरा शहराच्या नगराध्यक्षा अर्चना ठाकरे उपस्थित होत्या. मान्यवर पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष माणकचंदजी मालू, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक सल्लागार अनिल डोंगरे, गजानन जिवतोडे, अक्षय भिवदरे, सुनील बांगडे, हेमंत गिव्हे, निखिल बोबडे, गणेश मुसळे व शाळेतील संचालक मंडळ विराजमान होते. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या राणी पटेल व उपप्राचार्या श्रद्धा चौबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना क्रीडाभावना, शिस्त, संघभावना आणि प्रामाणिक प्रयत्न यांचे महत्त्व पटवून देत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या वतीने सर्व सहभागी खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, सीबीएसई अधिकारी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उद्घाटनानंतर स्पर्धेतील सामन्यांना उत्साहात प्रारंभ झाला. सदर कार्यक्रमाचे संचलन व आभार वर्धन खारकर व पूर्वी लोया यांनी केले.सदर स्पर्धेसाठी शाळेतील शारीरिक शिक्षण व क्रिडा विभाग व सांस्कृतिक विभाग आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकार्य करीत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




