महत्वाच्या बातम्या

 महिंद्रा ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगाराची नवी दिशा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा


- तिसऱ्या बॅचचा समारोप; १७ प्रशिक्षणार्थ्यांना महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत नियुक्तीपत्रांचे वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे. उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होतात. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने प्रामाणिकपणा, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर आपल्या कौशल्यात सातत्याने भर घालत उज्ज्वल भविष्य घडवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिंद्रा ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक तिसरी बॅच समारोप व नियुक्तीपत्र वितरण (प्लेसमेंट ड्राईव्ह) सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

जिल्हाधिकारी पंडा यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीने प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्यामध्ये आवश्यक तांत्रिक कौशल्यांचा प्रभावी विकास झाला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या उत्तम संधी प्राप्त होत असून कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक बळकट होत आहे.

ते पुढे म्हणाले की, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीने प्रशिक्षणार्थ्यांना दिलेली रोजगाराची संधी ही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील महत्त्वाची सुरुवात आहे. प्रत्येकाने प्रामाणिकपणे, शिस्तबद्ध पद्धतीने आणि समर्पित वृत्तीने काम करत स्वतःच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ करावी. चांगल्या कामगिरीमुळे भविष्यात अधिक मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि त्या संधींचा योग्य लाभ घेत स्वतःबरोबरच जिल्ह्याचेही नाव उंचावावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीमध्ये निवड झालेल्या १७ प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीचे प्रतिनिधी, प्रशिक्षक तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेले युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos