महत्वाच्या बातम्या

 बोदड परिसरात बिबट्याचा धुमाकूळ : दहापेक्षा अधिक शेळ्या फस्त


- जंगलालगतच्या शेतशिवारात वाढता वावर; शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : नजीकच्या बोदड व बोदड पोड येथील ग्रामीण तसेच जंगलालगतच्या शेतशिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. या बिबट्याने मागील काही दिवसांत दहापेक्षा अधिक शेळ्यांचा फडशा पाडल्याने परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जंगल परिसरालगत असलेल्या शेतशिवारात बिबट्याचा सातत्याने वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीची कामे करण्यासाठी शेतात जाणारे शेतकरी, शेतमजूर आणि महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्या एखाद्या दिवशी शेतात काम करणाऱ्या एकट्या व्यक्तीवर किंवा महिलेवर हल्ला करू शकतो, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यांमुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटना घडल्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करतात. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व पशुपालकांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतो. नुकसानभरपाई मिळत असली तरी प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ती अपुरी ठरत असल्याने नुकसानग्रस्तांचे पूर्ण समाधान होत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर कायम असल्याने नागरिकांनी वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. केवळ नुकसानभरपाई देण्याऐवजी बिबट्याला पकडून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वन विभागाने परिसरात गस्त वाढवावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच आवश्यक ती कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी बोदड व बोदड पोड येथील शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.





  Print






News - Wardha




Related Photos