शेतकरी कर्जमाफी योजनेतून राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ

- चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ६२३ कोटींची कर्जमाफी; कृषी पंपांसाठी मोफत वीज देण्याची माहिती : सुधीर मुनगंटीवार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राबविलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतून राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना तब्बल ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शुक्रवारी २४ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि कृषी क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी आणि निवृत्तीवेतनासाठी राज्याच्या तिजोरीवर ५० हजार कोटी रुपयांहून अधिकचा भार पडला तरी त्यावर प्रश्न उपस्थित केले जात नाहीत; मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरच प्रश्न उपस्थित केले जातात, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृष्टीने काम करीत असून, शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा भर असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. भविष्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता भासू नये, या उद्देशाने कृषी क्षेत्रासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कर्जमाफी योजनेचा चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे ६२३ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने वीज थकबाकीबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची वीज थकबाकी पूर्णपणे माफ करण्यात आली असून, साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांसाठी वीज मोफत देण्यात येणार असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.
महावितरणवरील ३२ हजार ६७९ कोटी रुपयांचे कर्ज राज्य सरकारने स्वतःच्या जबाबदारीवर घेतल्याने राज्यातील सुमारे ४५ लाख कृषी वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत आहे. कृषी क्षेत्रावर दरवर्षी सुमारे २५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असून, राज्यात ६ लाख कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी २४ नवीन धरणे उभारणे आणि १६ धरणांचा विस्तार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठीही सरकारने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली असून, १३६ लाख क्विंटल कापूस खरेदीसाठी १० हजार ८८३ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी महापौर संगीता खांडेकर, माजी आमदार अतुल देशकर, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




