जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या बडतर्फीची मागणी

- खासदार अमर काळे, डॉ. प्रशांत पडोळे व चंद्रशेखर आझाद यांचे संसदेच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराचा निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या बडतर्फीची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी खासदार अमर काळे, खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी शुक्रवारी संसद भवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्यापही राजीनामा न दिल्याने विरोधी पक्षातील खासदारांनी संसद भवन परिसरात निषेध आंदोलन छेडले.
हातात निषेधाचे फलक घेऊन संसदेसमोर धरणे आंदोलन करताना खासदार अमर काळे, डॉ. प्रशांत पडोळे आणि चंद्रशेखर आझाद यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून तातडीने बडतर्फ करण्याची मागणी केली. तसेच जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी ऐक्य दर्शवत त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी केंद्र सरकारने नीट पेपरफुटी प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेला हा गंभीर प्रकार गांभीर्याने हाताळावा, अशी मागणी खासदारांनी केली.
जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन न्याय मिळवून द्यावा, असेही खासदारांनी केंद्र सरकारला आवाहन केले.
News - Wardha




Petrol Price




