महत्वाच्या बातम्या

 वाढत्या उष्णतेमुळे शाळा लांबणीवर पडण्याची शक्यता : पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवा कायदा येणार : गृहराज्यमंत्री पंकज भोयर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा पारा प्रचंड वाढला आहे. या वाढत्या उन्हाचा आणि उष्णतेच्या लाटेचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसू नये, म्हणून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याबाबत शासन गंभीरपणे विचार करत आहे, अशी महत्त्वाची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपूर येथे दिली. १५ जूननंतर राज्यातील हवामान आणि परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भात सरकार तातडीने योग्य तो निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा आता सकाळच्या सत्रात -

वाढत्या कडक उन्हाची दखल घेत नागपूर विद्यापीठाने आपल्या परीक्षा पद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे. विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी आता सर्व परीक्षा दुपारऐवजी सकाळच्या सत्रात घेतल्या जाणार आहेत. याशिवाय, परीक्षा केंद्रांवर गर्दी होऊ नये आणि विद्यार्थ्यांना जवळचे केंद्र मिळावे, यासाठी परीक्षा केंद्रांची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचे नामदार भोयर यांनी सांगितले.

प्ले-स्कूलसाठी नवा कायदा अंतिम टप्प्यात
राज्यातील पूर्व प्राथमिक शाळांच्या (Pre-Primary Schools) नोंदणीसाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन कायदा आणण्याची शासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या कायद्याचा मसुदा मंजुरीसाठी न्याय विभागाकडे पाठवण्यात आला असून, आगामी विधिमंडळ अधिवेशनात हा कायदा मंजुरीसाठी आणण्याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न राहील, अशी माहिती त्यांनी दिली.

इंधन दरवाढ आणि अंमली पदार्थांवर कडक कारवाई
जागतिक परिस्थितीमुळे सध्या इंधनाचे दर वाढत असले, तरी ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच, राज्यातील तरुणाईला विळखा घालणाऱ्या अंमली पदार्थांच्या (ड्रग्ज) वाढत्या सेवनावर पूर्णपणे अंकुश ठेवण्यासाठी राज्यातील नारकोटिक्स टास्क फोर्स अधिक मजबूत आणि सक्रिय करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

काळाबाजार करणाऱ्या टँकरवर कारवाई; वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणतळे
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शेतकऱ्यांना हक्काचे पेट्रोल न देता त्याचा काळाबाजार करणाऱ्या टँकरवर प्रशासनाने तातडीने छापा टाकून तो जप्त केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई सुरू आहे.

दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेल्या वाघांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात पाण्याची टंचाई भासल्याने वन्यजीव मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळवतात. हे रोखण्यासाठी वन विभागाला अभयारण्यांमध्ये तातडीने कृत्रिम पाणतळे निर्माण करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून प्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध होईल.





  Print






News - Nagpur




Related Photos