मधमाशी पालनासाठी खादी व ग्रामोद्योग विभागाकडून ५० टक्के अनुदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : शेती पिके व फळबागांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मधमाशीपालन हा अत्यंत उपयुक्त शेतीपूरक व्यवसाय असून, त्यासाठी खादी व ग्रामोद्योग विभागामार्फत ५० टक्के अनुदान उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयाने केले आहे.
या योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य खरेदीसाठी ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मधखरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा तसेच मधमाशी संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येते. या योजनेसाठी व्यावसायिक मधपाळ, केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ तसेच केंद्रचालक संस्था पात्र आहेत.
वैयक्तिक मधपाळ हा साक्षर असावा व त्याचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे. स्वतःची शेती असल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल. केंद्रचालक प्रगतिशील मधपाळासाठी किमान दहावी उत्तीर्ण, २१ वर्षांपेक्षा अधिक तसेच स्वतःच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर किमान एक एकर शेती अथवा भाडेतत्त्वावरील शेती असणे आवश्यक आहे. शिवाय मधमाशीपालन, प्रजनन व मध उत्पादनाविषयी लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असणे, संस्थेच्या नावावर अथवा भाडेतत्त्वावरील किमान १ हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असणे तसेच मधमाशीपालन, प्रजनन व मध उत्पादनाविषयी लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र देणे बंधनकारक असून, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणेही अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन, ६ वा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे संपर्क साधावा. तसेच मधुक्षेत्रिक राहुल वैद्य मो. ७२४८९८३१०९, दूरध्वनी : ०७१२-२५३४९४२ किंवा संचालक, मधसंचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला क्र. ५, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा, पिन ४१२८०६, दूरध्वनी : ०२१६८-२६०२६४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Nagpur




Petrol Price




