जिल्हा क्रीडा संकुलात तातडीने स्वतंत्र विद्युत रोहीत्र बसवा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

- पालकमंत्र्यांकडून जिल्हा क्रीडा संकुल समितीचा आढावा
- जिल्ह्यात युवा खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा देण्याचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध खेळाडू वर्षभर वेगवेगळ्या खेळांचा सराव करत असतात. या खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. सोबतच खंडीत वीजपुरवठ्याचा त्यांच्या सरावावर परिणाम होऊ नये यासाठी संकुलाकरीता स्वतंत्र विद्युत रोहीत्र (DP) बसवा, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, क्रीडा उपसंचालक महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलात ४०० मीटर धावनपथ, खुले प्रेक्षागृह, विविध खेळांचे मैदान, मल्टीजिम, वेटलिफ्टींग, फिजीकल एक्झरसाईज हॅाल, फिटनेस सेंटर, बॅडमींटन हॅाल व शुटींग रेंज, संरक्षण भिंत, मुलामुलींचे वसतीगृह, बहुउद्देशिय हॅाल व वसतीगृहाचे विस्तारीकरण, संकुलातील अंतर्गत रस्ते, नाली, स्क्वॅश कोर्ट, बिलीयर्डस हॅाल, लॅान टेनिस कोर्ट इत्यादी कामे पुर्ण झाली आहे.
यासुविधांकरीता स्वतंत्र विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे वीजेची मागणी वाढल्याने आणि अखंडीत वीज पुरवठा होण्यासाठी स्वतंत्र रोहीत्र बसविणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे स्वतंत्र रोहीत्र बसविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी विद्युत विभागास केल्या.
जिल्हा क्रीडा संकुलात ४०० मीटर सिंथेटीक धावनपथ व पॅालीमर ग्रास फुटबॅाल मैदान तयार करण्याचे काम सद्या सुरु आहे. सदर कामासाठी यापूर्वी कंत्राटदारास मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे हे काम तातडीने पुर्ण करून मैदान खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात यावे. खेळाडूंच्या मागणीनुसार संकुलातील बॅडमिंटन हॅाल मधील वुडन फ्लोरींगमध्ये सिंथेटीक बॅडमींटन मॅट बसविण्यात यावी तसेच यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
संकुलातील बॅडमींटन हॅाल व व्यायामशाळेची नियमित देखभाल दुरुस्ती होणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात यावा. जिल्ह्यात अनेक गुणवान खेळाडू आहे. त्यांना चांगल्या सुविधा दिल्यास ते जिल्ह्याचे नाव मोठे करू शकतात. त्यामुळे खेळाडूंच्या मागणीप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. गेल्या काही दिवसात अनेक सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहे. त्या सुविधांची देखभाल दुरुस्ती नियमितपणे केली जावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
वर्धा व सेलू तालुका समितीचाही आढावा -
वर्धा तथा सेलू तालुका क्रीडा संकुल कार्यकारी समितीचा आढावा देखील या तालुका समित्यांचे अध्यक्ष तथा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतला. वर्धा तालुका क्रीडा संकुल उत्तम झाले आहे. संकुलाच्या विस्तारासाठी लगतची जागा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सेलू येथील क्रीडा संकुल देखील वर्धेच्याच धर्तीवर उत्तम करण्यात यावे. सेलू येथे व्यायामशाळा, क्रीडा सुविधांचा विस्तार करण्याबाबत सूचना केल्या.
News - Wardha




Petrol Price




