देव्हाडी शिवारातील नाल्याला पूर : ५०० शेतकऱ्यांचा शेताकडे जाणारा मार्ग ठप्प

- कमी उंचीच्या पुलामुळे दरवर्षी पावसाळ्यात संकट; धानाच्या खारी पाण्याखाली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : तालुक्यातील देव्हाडी शिवारात मुसळधार पावसामुळे नाला दुथडी भरून वाहत असून, कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सुमारे ५०० शेतकऱ्यांचा शेताकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. शेतकऱ्यांचा शेताशी संपर्क तुटल्याने खरीप हंगामातील शेतीची कामे खोळंबली आहेत. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
देव्हाडी शिवारातील नाल्याच्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी धान लागवडीसाठी खारी तयार केल्या आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात पाण्याचा मोठा प्रवाह निर्माण झाला. पुराचे पाणी शेतशिवारात शिरल्याने अनेक धानाच्या खारी पाण्याखाली गेल्या आहेत. पाणी ओसरल्यानंतरच पिकांच्या नुकसानीचे वास्तविक चित्र समोर येणार आहे.
कमी उंचीच्या पुलामुळे वाहतुकीचा प्रश्न -
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नाल्यावर तयार करण्यात आलेला शेतमार्ग अत्यंत कमी उंचीचा आहे. सिमेंट काँक्रीटच्या पायल्यांच्या माध्यमातून वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली असली तरी पावसाळ्यात नाल्याला पूर आला की हा संपूर्ण मार्ग पाण्याखाली जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
शेतीची कामे वेळेत पूर्ण करणे खरीप हंगामात अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांना मशागत, रोवणी आणि इतर शेतीच्या कामांसाठी अडथळे निर्माण होत आहेत.
दरवर्षीची समस्या; शेतकऱ्यांचे नुकसान -
देव्हाडी शिवारातील ही समस्या दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होत असूनही प्रशासनाकडून अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतीची कामे रखडणे, पिकांचे नुकसान होणे आणि आर्थिक फटका सहन करणे ही परिस्थिती शेतकऱ्यांच्या वाट्याला येत आहे.
पावसाळ्यात शेतकऱ्यांचा संपर्क तुटू नये आणि शेतीची कामे सुरळीत सुरू राहावीत यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नाल्याचे रुंदीकरण व पुलाची उंची वाढविण्याची मागणी -
नाल्याचे रुंदीकरण करून शेतमार्गावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
News - Bhandara




Petrol Price




