सातारा भोसले जंगलात वाघाचा हल्ला : गुराख्याचा मृत्यू, परिसरात भीतीचे सावट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जुनोना वनपरिक्षेत्रातील सातारा भोसले जंगल परिसरात गुरुवारी दुपारी पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सातारा भोसलेसह जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उसटू लहानूजी पोरेते (वय ५०) आणि नीलकंठ रामभाऊ पेंदोर हे नेहमीप्रमाणे गावातील जनावरे चारण्यासाठी सातारा भोसलेलगतच्या जंगलातील कम्पार्टमेंट क्रमांक ४४१ मध्ये गेले होते. दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास अचानक पट्टेदार वाघ समोर आला. अचानक झालेल्या या प्रसंगामुळे दोघांनीही जीव वाचविण्यासाठी धाव घेतली.
यावेळी नीलकंठ पेंदोर यांनी प्रसंगावधान राखत जवळील झाडावर चढून स्वतःचा जीव वाचविला. मात्र, उसटू पोरेते यांना तसे करता आले नाही. वाघाने त्यांच्यावर झडप घालत भीषण हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विकास महामंडळाचे प्रकल्प सहायक व्यवस्थापक आर. एस. कदम, जुनोना वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एन. मेश्राम तसेच सातारा भोसले बीटाचे वनरक्षक कावरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृत उसटू पोरेते यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. वन विकास महामंडळाकडून कुटुंबीयांना अंत्यविधीसाठी तातडीची ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच वाघाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी हल्ला झालेल्या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प सहायक व्यवस्थापक आर. एस. कदम यांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर सातारा भोसले व परिसरातील जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने वाघाच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




