चोरट्यांनी शाळेलाही सोडले नाही : कुलूप तोडून ३० हजारांच्या १० सायकली चोरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चोरट्यांची मजल आता शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचली असून राजुरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधून विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या १० सायकली अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शाळा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सन २०२१ मध्ये लोकवर्गणीतून गरजू विद्यार्थ्यांसाठी १० सायकली खरेदी करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला या सायकली शाळेच्या जुन्या इमारतीत ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, इमारतीत पाणी गळतीची समस्या असल्याने त्या नंतर शाळेच्या नव्या इमारतीतील एका खोलीत सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या.
शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्याने तसेच जनगणनेच्या कामात व्यस्त असल्यामुळे प्रभारी प्राचार्य काही दिवसांपासून शाळेत गेले नव्हते. ११ जून रोजी सायंकाळी प्रभारी प्राचार्य किशोर उईके व शिक्षक सपन खरतळे हे शाळेची पाहणी करण्यासाठी गेले असता नव्या इमारतीतील खोलीचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
खोलीची तपासणी केली असता तेथे ठेवण्यात आलेल्या १० सायकली गायब असल्याचे आढळून आले. प्रत्येकी सुमारे ३ हजार रुपये किंमतीच्या या सायकलींची एकूण किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून या सायकली चोरून नेल्याचे उघड झाले.
या प्रकरणी प्रभारी प्राचार्यांच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विक्की निर्वाण पुढील तपास करीत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
News - Chandrapur




Petrol Price




