महत्वाच्या बातम्या

 सफाई अपनाओ, बीमारी भगाओ मोहिमेत पीएम श्री साईबाबा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा जनजागृती उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नगर परिषद बल्लारपूरतर्फे राबविण्यात येत असलेल्या सफाई अपनाओ, बीमारी भगाओ या विशेष मोहिमेअंतर्गत तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर पीएम श्री साईबाबा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता व आरोग्याबाबत प्रभावी जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी शहरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.

यावेळी विद्यार्थ्यांनी हातात विविध जनजागृतीपर संदेश असलेले फलक घेऊन शाळा परिसरासह शहरातील विविध भागांत फेरी काढली. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची वाढ होऊन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो, याबाबत नागरिकांना जागरूक करण्यात आले. तसेच दूषित पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास संसर्गजन्य आजारांना आमंत्रण मिळते, याचीही माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
जनजागृती फलकांद्वारे साचलेले पाणी म्हणजे रोगांना खुले आमंत्रण, एक थेंब साचलेल्या पाण्याचा, शेकडो डासांच्या जन्माचा, हाताची स्वच्छता हीच रोगांवरची पहिली ढाल आणि स्वच्छ परिसर हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असे प्रभावी संदेश देण्यात आले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा संदेश दिला. परिसरात पाणी साचू न देणे, नियमित स्वच्छता राखणे आणि डासांची पैदास रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, यामुळे अनेक साथीच्या आजारांपासून संरक्षण मिळू शकते, असेही यावेळी सांगण्यात आले.

नगर परिषद बल्लारपूर आणि पीएम श्री साईबाबा प्राथमिक शाळेच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शाळा प्रशासन व नगर परिषदेतर्फे करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos