वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार : गावकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जंगलालगतच्या गावांसाठी वाघ आता जीवघेणा धोका बनला आहे. रुयाड शेतशिवारात शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता शेळ्या चारणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा मृत्यू केला. मृत शेतकऱ्याची ओळख दिगांबर महादेव पाटील (वय ४५) अशी करण्यात आली आहे. अचानक झुडपातून आलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.
या परिसरात वाघाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. काही महिन्यांपूर्वी प्रतापपूर शिवारात एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर गावकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या नरभक्षक वाघाला तातडीने जेरबंद करण्याचे आदेश असूनही, अद्याप प्रशासनाने अपेक्षित कारवाई केली नाही, असे गावकऱ्यांनी तक्रार केली आहे.
गावकऱ्यांच्या मागण्या -
- मृतकाच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक नुकसानभरपाई दिली जावी.
- नरभक्षक वाघाला २४ तासांत जेरबंद करावे.
- परिसरात २४ तास वनरक्षकांची गस्त सुरू ठेवावी.
अधिकाऱ्याच्या प्रश्नाने संताप वाढला -
घटनास्थळी दाखल झालेल्या एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांपैकी अमन शेंडे यांनी नागरिकांना तुम्ही वाघाला शिकार करताना पाहिले का? असा असंवेदनशील प्रश्न विचारल्याने संतप्त गावकऱ्यांचा रोष अधिकच वाढला. गावकऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित करण्याची मागणी केली आहे.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, वनविभागाने यापूर्वीच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज पुन्हा एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेला. घटनेनंतर रुयाड गावात संतापाचा उद्रेक झाला असून, नागरिकांनी तातडीने सुरक्षितता उपाययोजना अमलात आणण्याची मागणी केली आहे.
वनविभागाने वाघाचा शोध सुरू केला असून, परिसरात सतर्कता वाढविण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तैनाती केली आहे.
News - Nagpur




Petrol Price




