महत्वाच्या बातम्या

 देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत सेवा महोत्सव-२०२६ : २१ ते ३० जुलैदरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्रात २१ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत सेवा महोत्सव-२०२६ चे आयोजन करण्यात येणार आहे. समाजसेवा, लोकसहभाग आणि जनकल्याणाचा संदेश देणाऱ्या या महोत्सवाचे नियोजन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद सगुणा रामजी नरोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. या सेवा महोत्सवाच्या नियोजनासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची विस्तृत बैठक पार पडली. बैठकीत महोत्सवातील विविध उपक्रमांचे नियोजन, जबाबदाऱ्या आणि अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले की, सेवा महोत्सव हा केवळ वाढदिवसाचा उत्सव नसून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रुजविलेल्या सेवा हाच संघटनाचा संस्कार या विचारातून प्रेरणा घेऊन गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने किमान एक समाजोपयोगी उपक्रम स्वतःच्या पुढाकाराने राबवून हा सेवा महोत्सव लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून द्यावे, असे आवाहन आमदार डॉ. नरोटे यांनी केले.

या सेवा महोत्सवांतर्गत विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबिर, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, दिव्यांग बांधवांना सहाय्य, शैक्षणिक साहित्य वाटप, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, युवक संवाद, शेतकरी सन्मान, नाट्य प्रशिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, माजी सैनिकांचा गौरव, रुग्णालयांमध्ये फळवाटप, पर्यावरण जनजागृती आदी उपक्रमांचा समावेश आहे.

या माध्यमातून हजारो नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक उपक्रम प्रभावीपणे आणि लोकसहभागातून यशस्वी करण्यावर भर देण्यात येणार आहे. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सेवा महोत्सवातील सर्व कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याचा आणि नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, तालुकाध्यक्ष अनिल कुनघाडकर, दत्तू सूत्रपवार, साजन गुंडावार, राकेश सरकार, नगर परिषद गडचिरोलीच्या सभापती सीमा कन्नमवार, नगरसेविका साक्षी बोलूवार, नगरसेविका ज्ञानेश्वरी धंदरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याशिवाय आकाश सातपुते, हर्षद भांडेकर, बंडू झाडे, साई सीलमवार, रजत वंजारी, यश कोंडावार, निखील गुंडमवार, कीर्ती मासूरकर, दिपक सातपुते आदींचीही उपस्थिती होती. बैठकीच्या शेवटी आमदार डॉ. मिलिंद सगुणा रामजी नरोटे यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सेवा महोत्सवातील प्रत्येक उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारा हा सेवा महोत्सव गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos