गंजीरामन्नापेठा येथील जि.प. प्राथमिक शाळा पूर्ववत सुरू करा : पालकांची प्रशासनाकडे मागणी


- तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन; मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत नडीकुडा केंद्रातील गंजीरामन्नापेठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पटसंख्या कमी असल्याचे कारण देत मागील वर्षी बंद करण्यात आल्याने गावातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही शाळा चालू शैक्षणिक सत्रापासून पूर्ववत सुरू करून विद्यार्थ्यांना गावातच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकांनी प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात नायब तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली यांना निवेदन पाठविण्यात आले.
अंकिसा परिसरातील गंजीरामन्नापेठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मागील शैक्षणिक वर्षापासून पटसंख्या कमी असल्याचे कारण देत शिक्षण विभागाने बंद केली. या निर्णयामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावे लागत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम आणि पोचमपल्ली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच ललिता सल्ला यांनी पालकांसह सिरोंचाचे नायब तहसीलदार एन. हलामी यांची भेट घेतली. तहसीलदारांच्या दालनात शाळा पूर्ववत सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना निवेदन पाठविण्यात आले.
पालकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासन एकीकडे ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यावर भर देत आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. अशा परिस्थितीत केवळ पटसंख्या कमी असल्याचे कारण पुढे करून संपूर्ण शाळाच बंद करणे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या विरोधात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
शाळा बंद झाल्यानंतर गंजीरामन्नापेठा येथील विद्यार्थ्यांना रंगधामपेठा येथील जिल्हा परिषद शाळेत संलग्न करण्यात आले आहे. मात्र, ही शाळा गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असून विद्यार्थ्यांना दररोज राष्ट्रीय महामार्गावरून पायी प्रवास करावा लागत आहे. प्राथमिक वर्गातील लहान मुलांसाठी हा प्रवास धोकादायक ठरत असून त्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या गावातील १४ विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. शाळा बंद झाल्यापासून त्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत असून नियमित शिक्षणात अडथळे निर्माण होत असल्याचे पालकांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक सत्रापासूनच गंजीरामन्नापेठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. अन्यथा तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पालकांनी निवेदनातून दिला आहे.
नायब तहसीलदार एन. हलामी यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम, माजी सरपंच ललिता सल्ला, रमेश कस्तुरी, शंकर कुमरी, सुरेश दुर्गम, कोंडय्या जोडे, सारय्या नामाला तसेच गावातील मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




