गडचिरोलीच्या सुनील पोरेड्डीवार यांना प्रतिष्ठेचा विदर्भ रत्न पुरस्कार २०२६ प्रदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे सुपुत्र तथा प्रसिद्ध उद्योजक सुनील केशवराव पोरेड्डीवार यांना उद्योग, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा विदर्भ रत्न पुरस्कार २०२६ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गडचिरोलीसारख्या आदिवासी, ग्रामीण व मागासलेल्या जिल्ह्यात राहून गेल्या तब्बल २५ वर्षांपासून उद्योग क्षेत्रात सातत्याने कार्य करताना त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या बहुमोल कार्याची दखल घेत रिसील डॉट इन, नाशिक या संस्थेच्या वतीने त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
नागपूर येथील सालीटेअर हॉटेल, अॅड बँकेट हॉल येथे शनिवार, १९ जुलै २०२६ रोजी आयोजित भव्य पुरस्कार वितरण समारंभात प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते सुनील पोरेड्डीवार यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह मोमेंटो आणि गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. उपस्थितांनी सुनील पोरेड्डीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सुनील पोरेड्डीवार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील विविध भागांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.
त्यांच्या या सन्मानामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून जिल्ह्याच्या नावाला नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




