एका शिक्षकाचे समायोजन, दुसरा सुट्टीवर, रामपूरची शाळा वाऱ्यावर!


- विद्यार्थी परतले घरी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एक किंवा दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यामुळे अनेकदा शाळा बंद राहत  असून विद्यार्थ्यांच्या  शिक्षणाचे तिनतेरा वाजले आहे. असाच प्रकार चामोर्शी तालुक्यातील रामपूर येथे घडला आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक शिक्षक प्रतिनियुक्तीवर असून दुसरा शिक्षक रजेवर असल्याने शाळाच बंद पडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे  भवितव्य काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
रामपूर येथील शाळेत इयत्ता १ ते ४ पर्यंत वर्ग भरविले जातात. १९९७  पासून येथे जि.प. ची शाळा आहे. सध्या या शाळेची पटसंख्या ११  असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपासून एका शिक्षकाची कोणत्या ना कोणत्या शाळेत प्रतिनियुक्ती केली जात आहे. यामुळे एकाच शिक्षकाच्या भरवशावर शाळेचा कारभार चालतो. यावर्षी एका शिक्षकाचे उमरी येथील जि.प. शाळेत समायोजन करण्यात आले. यामुळे एकच शिक्षक कार्यरत आहे. याबाबत  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांना  पालकांनी निवेदन देवून शिक्षकाचे समायोजन रद्द करण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे ही शाळा एकशिक्षकी झाली. आता कार्यरत शिक्षक सुट्टीवर असल्याने शाळा वाऱ्यावर  आली आहे. शिकविण्यासाठी शिक्षकच नाही तर विद्यार्थी शिकणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आज २४  आॅक्टोबर रोजी शाळाच उघडली नाही. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे दुसऱ्या  शिक्षकाची नियुक्ती न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-24


Related Photos