महत्वाच्या बातम्या

 दुचाकी अपघातात तरुण अभियंत्याचा मृत्यू : दोन बसेस समोरासमोर धडकल्या, ५९ प्रवासी सुखरूप


- गडचिरोली तालुक्यात २४ तासांत दोन अपघात : एक अभियंता व दोन अल्पवयीन जखमी

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांनी परिसर हादरला आहे. कन्हेरी फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन धानोरा पंचायत समितीतील तरुण सहायक अभियंता पराग दूधराम मोगरकर २४ वर्ष  यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत चांदाळा-जांभळी मार्गावर मानव विकास मिशनची बस आणि एसटी बस यांची समोरासमोर धडक झाली. मात्र, दोन्ही बसमधील सर्व ५९ प्रवासी सुदैवाने सुखरूप बचावल्याने मोठी दुर्घटना टळली.

कन्हेरी फाट्याजवळ भीषण दुचाकी अपघात -

१६ जुलै रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील कन्हेरी फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात धानोरा पंचायत समितीचे सहायक अभियंता पराग मोगरकर गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेले सहकारी अभियंता विवेक सुमित खेडेकर २३ वर्ष  रा. सोनापूर कॉम्प्लेक्स, गडचिरोली हेही जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गंभीर जखमी झालेल्या पराग मोगरकर यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री सुमारे ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनामुळे गडचिरोलीसह शासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

वडिलांनंतर अनुकंपावर नोकरी आठ महिन्यांपूर्वीच अभियंता पदावर नियुक्ती -

पराग मोगरकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. कोरोना काळात एप्रिल २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर पराग यांना अनुकंपा तत्त्वावर परिचर म्हणून नोकरी मिळाली होती. आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी पदोन्नती मिळवत अवघ्या आठ महिन्यांपूर्वी गट क संवर्गातून सहायक अभियंता पदाची जबाबदारी स्वीकारली होती.

त्यांच्या पश्चात आजी-आजोबा, आई आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. दुपारी कठाणी नदीघाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला.

अल्पवयीन चालकांमुळे घडला अपघात - 

या अपघातास कारणीभूत ठरलेली दुसरी दुचाकी दोन अल्पवयीन मुले चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या दोघांनाही अपघातात दुखापत झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांनी मुलांच्या हातात वाहनांची चावी देताना अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

चांदाळा-जांभळी मार्गावर दोन बसेसची समोरासमोर धडक - 

१७ जुलै रोजी दुपारी सुमारे १२ वाजता चांदाळा-जांभळी मार्गावर मानव विकास मिशनची बस आणि एसटी बस यांची समोरासमोर धडक झाली. अहेरीहून गडचिरोलीकडे प्रवासी घेऊन येणारी मानव विकास मिशनची बस जांभळीजवळील वळणावर आली असता पावसामुळे रस्त्याच्या कडेला साचलेल्या चिखलाचा अंदाज चालकाला आला नाही. त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती समोरून येणाऱ्या गडचिरोली-अहेरी एसटी बसवर जाऊन आदळली.

वळणावर झालेल्या या धडकेमुळे दोन्ही बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, दोन्ही वाहनांचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. दोन्ही बसमधील एकूण ५९ प्रवासी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

एसटी प्रशासनाची तत्परता -

अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली आगारातून एसटी महामंडळाचे विशेष पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी सुरक्षित पोहोचवण्यासाठी गडचिरोलीहून पर्यायी बस पाठविण्यात आली. एसटी प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर -

२४ तासांत घडलेल्या या दोन अपघातांनी रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. एका निष्काळजीपणामुळे तरुण अभियंत्याचा जीव गेला, तर दुसरीकडे पावसाळ्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि चिखलामुळे बस अपघाताची घटना घडली. अल्पवयीनांकडून वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे पालन आणि पावसाळ्यातील रस्त्यांची सुरक्षितता याबाबत प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos