महत्वाच्या बातम्या

 वातावरण बदलातील आव्हानांना स्वीकारून कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


- शेतकऱ्यांच्या अनुभवांना उच्च तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी हॉटेल सेंटर पॉईंट येथे विशेष कृषी परिसंवाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : वातावरणातील बदल, वाढती उत्पादन खर्चाची आव्हाने आणि बदलत्या बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेता कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या अनुभवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित विशेष कृषी परिसंवादात ते बोलत होते.

जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणून अनुभवांचे आदानप्रदान व्हावे आणि शासनाच्या कृषी विकास नियोजनात त्यांच्या सूचना व अपेक्षांचा समावेश करता यावा, या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आत्माच्या प्रकल्प संचालिका डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, उपसंचालक पल्लवी तलमले यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यातील १३० हून अधिक प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक या परिसंवादात सहभागी झाले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी ते थेट ग्राहक अशी सक्षम उत्पादन व विक्री साखळी उभारल्याशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होणार नाही. वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांना शेतकरी समर्थपणे सामोरे जात असून त्यांच्या अनुभवाला आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास नागपूर जिल्ह्यात फायदेशीर आणि शाश्वत शेतीचा नवा मार्ग विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागपूर जिल्ह्यात धान, सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा तसेच विविध फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. बदलत्या हवामानामुळे पीकपद्धतीत बदल, आंतरपिकांची संधी, किड व रोग व्यवस्थापन, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका, सेंद्रिय शेती, महिला बचत गटांच्या माध्यमातून कृषी व्यवसायाचा विस्तार तसेच कृषी क्षेत्रातील मनुष्यबळ उपलब्धता अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पात्र लाभार्थ्यांची पारदर्शक निवड आणि प्रभावी व्यवस्थापन यावर शासन विशेष भर देत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे नावीन्यपूर्ण व प्रायोगिक कल्पना असल्यास त्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

परिसंवादात कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर देण्यात आला. वनक्षेत्रालगतच्या शेतीतील पिकांचे संरक्षण करण्यासाठी लेझर आणि स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर, फळबागांसाठी सुलभ प्रुनिंग मशिन, संत्रा ग्रेडिंग व पॅकेजिंग सेंटर, लीफ टेस्टिंग लॅब, बूम स्प्रेअर, ठिबक सिंचन प्रणालीचे ऑटोमेशन यासाठी अधिक अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.

याशिवाय बॅटरीवर चालणारे पॉवर टिलर, सोलर ड्रायर, चियासीड व मोहरीसारख्या पिकांसाठी आधुनिक हार्वेस्टर, भात पिकासाठी डीएसआर यंत्र आणि भात लावणी यंत्र, सोयाबीनसाठी बीबीएफ व बीज प्रक्रिया यंत्र तसेच कापूस पिकासाठी कॉटन ग्रेडर यांसारखी अत्याधुनिक कृषी यंत्रसामग्री शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या परिसंवादातून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत, नफ्याची आणि तंत्रज्ञानाधारित शेतीसाठी दिशा निश्चित करण्यात आल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





  Print






News - Nagpur




Related Photos