नवनियुक्त प्राध्यापकांसाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम

- अध्यापन पद्धती परीक्षा प्रणाली व विद्यापीठाच्या कार्यसंस्कृतीचे सखोल मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे शैक्षणिक सत्र २०२६–२७ मध्ये नव्याने नियुक्त झालेल्या प्राध्यापकांसाठी फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम–२०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नवनियुक्त प्राध्यापकांना विद्यापीठाची शैक्षणिक, प्रशासकीय आणि अध्यापनाशी संबंधित कार्यपद्धतीची सर्वंकष माहिती देण्यात आली.
सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठाची शैक्षणिक रचना, अभ्यासक्रम प्रणाली, परीक्षा पद्धती, नियमावली, प्रशासन, गुणवत्ता हमी प्रणाली तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या चेतना सेंटरचे संचालक डॉ. महेश कोलतमे यांनी आधुनिक अध्यापन पद्धती, समावेशक शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, मूल्यमापन प्रक्रिया आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले. बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर त्यांनी उदाहरणांसह प्रकाश टाकला.
यानंतर समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) अनुषंगाने अभ्यासक्रमातील बदल, शैक्षणिक प्रणाली आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षकांची भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली.
दुपारच्या सत्रात उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड यांनी विद्यापीठाचा इतिहास, स्थापना, उद्दिष्टे, प्रशासकीय रचना, विविध प्राधिकरणे, आर्थिक व प्रशासकीय कार्यपद्धती, परीक्षा प्रणाली आणि विद्यापीठाच्या कार्यसंस्कृतीची माहिती उपस्थितांना दिली. अध्यापनाबरोबरच विद्यापीठाच्या प्रशासकीय प्रक्रियेचे ज्ञान आत्मसात करणेही प्राध्यापकांसाठी तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोपप्रसंगी आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी अशा प्रकारचे इंडक्शन प्रशिक्षण नव्या प्राध्यापकांना विद्यापीठाच्या कार्यसंस्कृतीशी समरस होण्यास तसेच अध्यापन आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.या कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्राध्यापिका अपेक्षा पिंपळे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




