महत्वाच्या बातम्या

 वर्षभरापासून लिपिकाचे पद रिक्त : शिक्षक, विद्यार्थी त्रस्त


- कुडेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील प्रकार : ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तालुक्यातील कुडेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये वरिष्ठ सहायक (लिपिक) पद गेल्या वर्षभरापासून रिक्त असल्याने शाळेच्या प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. लिपिकाची बदली होऊन एक वर्ष उलटूनही त्या जागी नवीन नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने रिक्त पद भरावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

कुडेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून, परिसरातील शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शाळेत काही शिक्षकांची पदेही रिक्त असल्याची माहिती असून, उपलब्ध शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, प्रशासकीय कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले वरिष्ठ सहायक (लिपिक) पद रिक्त असल्याने अनेक दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे.

शाळेत वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत असलेले गेडाम यांची गेल्यावर्षी बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त झाले असून, तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटूनही त्या जागी नवीन लिपिकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे विविध दाखले, शालेय नोंदी, कार्यालयीन पत्रव्यवहार, शासकीय अहवाल, आर्थिक व प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता यांसारखी अनेक कामे रखडत असल्याचे सांगितले जात आहे.

शाळेचे एकमेव लिपिक पद रिक्त असल्याने स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि प्रशासनाने गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून लिपिक नियुक्तीची मागणी केली आहे. मात्र, भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, रिक्त पदामुळे शिक्षकांवर अतिरिक्त प्रशासकीय कामांचा भार पडत असून त्याचा परिणाम अध्यापनावरही होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसाठी वारंवार शाळेत फेऱ्या माराव्या लागत असल्याने पालकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.

यापुढेही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यास विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कुडेगाव जिल्हा परिषद हायस्कूलमधील रिक्त वरिष्ठ सहायक (लिपिक) पदावर तत्काळ नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos