महत्वाच्या बातम्या

 सात बहिणी डोंगरावर पर्यटकांची गर्दी वाढली : सुरक्षेअभावी अपघाताची भीती


-धोकादायक कड्यांवर सेल्फी आणि रील्सचा मोह; प्रशासनाकडे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सध्या प्रसिद्ध घोडाझरी पर्यटनस्थळ बंद असल्याने साहसी पर्यटकांचा ओढा नागभीडजवळील सात बहिणी सेव्हन सिस्टर्स हिल डोंगराकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

मात्र, या डोंगराची दुर्गम, उंच आणि खडकाळ रचना लक्षात घेता येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटनस्थळी कोणतीही शासकीय सुरक्षा व्यवस्था नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

हिरवाईने नटलेले जंगल, ट्रेकिंगसाठी असलेल्या खडकाळ वाटा, दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि नैसर्गिक गुहा यामुळे सात बहिणी डोंगर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे. वर्षभर येथे पर्यटकांची वर्दळ असते. विशेषतः शनिवार आणि रविवारच्या सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी उसळते.

मात्र, या ठिकाणी भेट देणारे काही पर्यटक सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. डोंगराचा बहुतांश भाग खडकाळ असून, पावसाळ्यात खडकांवर शेवाळ आणि ओलावा निर्माण झाल्याने परिसर निसरडा होतो. अशा धोकादायक परिस्थितीत अनेक हौशी पर्यटक खोल दरीच्या कड्यावर उभे राहून मोबाइलवर रील्स तयार करणे, सेल्फी काढणे आणि थरारक छायाचित्रे टिपण्याच्या प्रयत्नात दिसतात.

फोटो किंवा व्हिडीओच्या नादात पाय घसरून अथवा तोल जाऊन पर्यटक खोल दरीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सुरक्षा रक्षक, बॅरिकेड्सची मागणी -
शनिवार, रविवार तसेच शासकीय सुटीच्या दिवशी येथे होणारी गर्दी लक्षात घेता संबंधित प्रशासन किंवा वन विभागाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

याशिवाय, धोकादायक कड्यांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यापासून रोखण्यासाठी तात्पुरते संरक्षक कठडे बॅरिकेड्स उभारावेत, धोक्याची सूचना देणारे फलक लावावेत तसेच जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्या आणि रील्स बनविणाऱ्या पर्यटकांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

सात बहिणी डोंगराचे वैशिष्ट्य -
नागभीड परिसरातील सात बहिणी डोंगराला नैसर्गिक सौंदर्यासोबतच पौराणिक महत्त्वही आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार या डोंगरावर पूर्वी अंबाई, निंबाई, उमाई, गौराई, मुक्ताई, पवराई आणि भिवराई या सात बहिणींचे वास्तव्य होते. त्यामुळे या डोंगराला सात बहिणींचा डोंगर म्हणून ओळखले जाते.

डोंगरावरील खडकाळ रचना, दगडात कोरलेल्या पायऱ्या, छोट्या नैसर्गिक गुहा आणि साहसी चढाईचा अनुभव हे ट्रेकर्ससाठी विशेष आकर्षण आहे. डोंगराच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर आजूबाजूचा हिरवागार, निसर्गरम्य परिसर आणि विहंगम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणून वेगाने लोकप्रिय होत असलेल्या या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos