महत्वाच्या बातम्या

 निसर्गसौंदर्याला कुलूप : घोडाझरी पर्यटनस्थळ तीन वर्षांपासून बंद


- पर्यटनाला कधी मिळणार हिरवा कंदील ? मंजुरीअभावी पुनर्प्रारंभ रखडला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / नागभीड : पूर्व विदर्भातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या घोडाझरी तलाव पर्यटन केंद्राला गेल्या तीन वर्षांपासून कुलूप लागले आहे. निसर्गरम्य वातावरण, विस्तीर्ण जलाशय आणि आकर्षक परिसरामुळे पर्यटकांची मोठी पसंती मिळवलेल्या या पर्यटनस्थळाचा विकास आणि पुनर्प्रारंभाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.

घोडाझरी तलाव पर्यटन केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी चंद्रपूर पाटबंधारे विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेला नागपूर येथील संबंधित कार्यालयाची मंजुरी अद्याप मिळालेली नसल्याने पुढील कामे रखडली आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी सुरू होणार, असा प्रश्न पर्यटक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सिंचनासोबत पर्यटनाचेही महत्त्वाचे केंद्र -

सिंदेवाही तालुक्यातील घोडाझरी तलाव हा केवळ शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा महत्त्वाचा आधार नाही, तर पर्यटनाच्या दृष्टीनेही या भागाची वेगळी ओळख निर्माण करणारे ठिकाण आहे. तलावातील पाण्याचा विस्तीर्ण परिसर, सभोवतालची हिरवाई आणि शांत वातावरण यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आकर्षित होत होते. घोडाझरी परिसरात पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत होत्या. मात्र, पर्यटन केंद्र बंद असल्याने पर्यटकांची संख्या घटली असून स्थानिक व्यवसायांवरही त्याचा परिणाम झाला आहे.

मंजुरीच्या प्रतीक्षेत प्रक्रिया -

घोडाझरी पर्यटनस्थळाच्या पुनर्विकासासाठी पाटबंधारे विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंदेवाही येथील पाटबंधारे विभागाने ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाही होणार आहे. मंजुरीच्या विलंबामुळे पर्यटनस्थळाच्या विकासाचे काम रखडले असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तीन वर्षांपासून बंद असलेले हे पर्यटन केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पर्यटन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा -

घोडाझरी तलाव पर्यटन केंद्र पुन्हा सुरू झाल्यास पूर्व विदर्भातील पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या घोडाझरीला पुन्हा पर्यटकांची वर्दळ कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा संपून हे पर्यटनस्थळ लवकरच खुले होईल, अशी अपेक्षा पर्यटक आणि नागरिक व्यक्त करत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos