महत्वाच्या बातम्या

 गोंडपिपरी तालुक्यात भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत एक ठार, पाच जण गंभीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव फाट्याजवळ सोमवारी १३ जुलै रोजी दुपारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात भरधाव ट्रकने पिकअप वाहनाला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. मृताची ओळख काशिनाथ दुधबावरे (वय ५२), रा. दर्शनीमाल अशी झाली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रामाळा येथील रहिवासी राजेश्वर नागेश्वर दुर्कीवार (वय २८) हे एमएच-३३-पी-१९९० क्रमांकाचे पिकअप वाहन चालवून मालवाहतुकीचा व्यवसाय करतात. १२ जुलै रोजी ते माल घेऊन तेलंगणातील करीमनगर येथे गेले होते. माल उतरवल्यानंतर त्यांनी तेथे विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमरेवेली येथे दर्शन घेऊन ते रामाळाकडे परत निघाले.

परतीच्या प्रवासादरम्यान वाटेत भेटलेल्या काही प्रवाशांना त्यांनी त्यांच्या विनंतीवरून वाहनात बसवून घेतले. यामध्ये काशिनाथ दुधबावरे, मनिषा गंगाधर वासेकर, नम्रता तलांडे तसेच अन्य प्रवाशांचा समावेश होता.

दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास वेडगाव गावापूर्वीच्या वळणावर समोरून येणाऱ्या एमएच-३४-बीजी-४८६८ क्रमांकाच्या ट्रकने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे पिकअपला समोरासमोर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की पिकअपचे मोठे नुकसान झाले. मागील बाजूस बसलेले काशिनाथ दुधबावरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात चालक राजेश्वर दुर्कीवार, त्यांचे सहकारी अंकुश मारोती कंकलवार व रोहित कोरीवार तसेच मनिषा गंगाधर वासेकर आणि नम्रता तलांडे हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचार करीता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या प्रकरणाचा पुढील तपास लाठी पोलीस करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos