अंमली पदार्थांच्या अवैध जाळ्यावर चंद्रपूर पोलिसांचा निर्णायक घाव : ६६.१४ लाखांचे ड्रग्ज नष्ट


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या ५१ गुन्ह्यांतील एकूण ६६ लाख १४ हजार ८८६ रुपयांचे अंमली पदार्थ नियमानुसार नष्ट केले. जिल्हा न्यायालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती यांच्या परवानगीनंतर ही प्रक्रिया पार पडली.
या कारवाईत ३१० किलो ३४० ग्रॅम गांजा किंमत ५३ लाख २ हजार ४८६ रुपये, ४२० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर किंमत १३ लाख ५ हजार रुपये आणि ७६ ग्रॅम गर्द किंमत ७ हजार ४०० रुपये असा एकूण ६६ लाख १४ हजार ८८६ रुपयांचा अंमली पदार्थ नष्ट करण्यात आला
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जप्त अंमली पदार्थ शासकीय वाहनातून नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड येथे सुरक्षितरीत्या नेण्यात आले. तेथे अत्याधुनिक बॉयलर प्रणालीद्वारे पर्यावरणपूरक पद्धतीने भट्टीत जाळून त्यांचा पूर्णतः नाश करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि प्रभारी गृह उपअधीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या वेळी कारवाईत नोडल अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे , सफौ अरुण खारकर, पोहवा सुधीर मत्ते, पोअं किशोर वकाटे, प्रदीप मडावी, अमोल साबे, वैभव पत्तीवार, चापोहवा प्रमोद डोंगरे, पोअं रूपेश बारशिंगे, शुभम बल्की यांनी सहभाग घेतला.
चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक प्रभावी करण्यात येत असून, अशा अवैध व्यवसायावर कठोर कारवाई भविष्यातही सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




