महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर बसस्थानकात प्रवासी महिलेची पर्स लंपास : अडीच लाखांचे दागिने चोरीला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेची पर्स लंपास करून तब्बल २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

राजुरा येथील शिवाजीनगर वार्ड क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या शुभांगी किशोर पडवेकर (वय ५९) या आपल्या पतीसोबत नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी ९ मे रोजी चंद्रपूरला आल्या होत्या. घरात कोणी नसल्याने त्यांनी स्वतःचे व पतीचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम एका छोट्या पर्समध्ये ठेवून ती हँडपर्समध्ये ठेवली होती.

सायंकाळी सुमारे ४.१५ वाजता राजुरा बसस्थानकावरून चंद्रपूरकडे येणाऱ्या बसमध्ये त्या बसल्या. प्रवासादरम्यान त्यांनी तिकीट काढताना पर्स व्यवस्थित असल्याची खात्री केली होती. सायंकाळी ५.१५ वाजता चंद्रपूर बसस्थानकावर उतरून त्या घुग्घुसला जाणाऱ्या बसची प्रतीक्षा करीत होत्या. त्यानंतर सुमारे ६.१० वाजता घुग्घुसकडे जाणाऱ्या बसमध्ये चढल्यानंतर काही वेळाने तिकीटासाठी पैसे काढताना त्यांच्या पर्सची चैन उघडी असल्याचे दिसून आले. आतील छोट्या पर्ससह सोन्याचे दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली.

घटनेची माहिती मिळताच बस पडोली पोलीस ठाण्यासमोर थांबविण्यात आली. पोलिसांनी बसमधील संशयितांची चौकशी केली; मात्र चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आला नाही.

चोरीस गेलेल्या ऐवजात विविध सोन्याचे दागिने, अंगठ्या, कानातील दागिने, गौतम बुद्ध लॉकेट यांसह एकूण ८४ ग्रॅम सोन्याचे दागिने असून त्यांची किंमत २ लाख ५२ हजार रुपये आहे. याशिवाय ४ हजार रुपये रोख रक्कमही चोरीस गेली. एकूण २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी रामनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos