महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत अवैध देशी दारू साठ्यावर पोलिसांची मोठी कारवाई : १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ₹१ लाख किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत अर्धवट जळालेला दारूचा मुद्देमाल आढळून आला असून एक आरोपी फरार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही काही व्यक्तींकडून छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री व वाहतूक करण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा गैरकृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिले होते.

त्याच अनुषंगाने १७ जून २०२६ रोजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे आणि पोलीस पथकाने मौजा शिवनी येथे धाड टाकून ही कारवाई केली.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिवनी येथील किरण शंकर ताडपल्लीवार यांनी आपल्या शेतातील फार्महाऊसमध्ये देशी दारूचा मोठा साठा अवैधरित्या विक्रीसाठी ठेवला होता. पोलिसांनी पंचासमक्ष केलेल्या तपासणीत जमिनीखाली तयार करण्यात आलेल्या सिमेंट टाकीत लपवलेला आणि अंशतः नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला देशी दारूचा साठा आढळून आला.

या कारवाईत ९० मिली क्षमतेच्या सुमारे २ हजार देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून एकूण मुद्देमालाची किंमत १ लाख इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात अप. क्र. ०७८८/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी किरण ताडपल्लीवार (वय ३७) सध्या फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

गडचिरोली पोलिसांकडून दारूबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू असून अशा प्रकारच्या अवैध दारू व्यवसायावर पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos