गणेशोत्सव २०२६ पूर्वतयारीचा आढावा : चंद्रपूर जिल्ह्यात डीजे बंदीची प्रभावी अंमलबजावणी होणार


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ चंद्रपूर : आगामी सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ शांततापूर्ण, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेड येथे पूर्वतयारी आढावा व नियोजन बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीत गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, सुरक्षा आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यंदाच्या गणेशोत्सवात जिल्ह्यात डीजे वर संपूर्ण बंदी राहणार असून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्यासह महानगरपालिका व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तिकार, डीजे चालक-मालक, पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक मिळून सुमारे २०० ते २५० जणांनी बैठकीला उपस्थिती लावली.
बैठकीत सर्व गणेश मंडळांनी आपल्या स्तरावर समन्वय समित्या स्थापन करून स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहनांवर लहान मुलांना बसवू नये, संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यावर भर देण्यात आला. तसेच प्रशासनातर्फे आयोजित आदर्श गणेश मंडळ स्पर्धे मध्ये सर्व मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले.
बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे जिल्ह्यात गणेश चतुर्थीपासून डीजे वाजवण्यावर संपूर्ण बंदी राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार व ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी ही बंदी प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. डीजे चालक मालक तसेच गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
जिल्हा प्रशासन आणि चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडून गणेशोत्सवासाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात येत असून नागरिकांनी व सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून उत्सव शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा जपत उत्साहात साजरा करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
News - Chandrapur




Petrol Price




