महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चातगाव आरोग्य उपकेंद्राला मध्यरात्री अचानक भेट


- रात्रीच्या आरोग्य सेवेची तत्परता, औषधसाठा, मलेरिया निदान किट्स व नोंदींची केली प्रत्यक्ष पडताळणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चोवीस तास दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी बुधवारी मध्यरात्री गडचिरोलीजवळील चातगाव आरोग्य उपकेंद्राला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेट देऊन सखोल पाहणी केली.

रात्रीच्या वेळी एखादा रुग्ण किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आरोग्य कर्मचारी किती तत्परतेने प्रतिसाद देतात, उपलब्ध सुविधा कशा कार्यरत आहेत आणि नागरिकांना आवश्यक उपचार वेळेत मिळतात का, याची प्रत्यक्ष पडताळणी करणे हा या भेटीमागील मुख्य उद्देश होता. भेटीदरम्यान उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला. उपचारासाठी आलेल्या एका जोडप्याशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबतही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य व साथीच्या आजारांचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपकेंद्रातील औषधसाठ्याची सविस्तर तपासणी करण्यात आली. ताप, अतिसार, सर्दी, मलेरिया आदी आजारांवरील आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे का, याची खात्री करण्यात आली. तसेच मलेरिया निदानासाठी आवश्यक असलेल्या आरडीके किट्सची उपलब्धता, त्यांचा साठा आणि वापराची तयारी याचीही पाहणी करण्यात आली.

यावेळी उपकेंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या, त्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा, उपलब्ध मनुष्यबळ, सेवा वितरणाची कार्यपद्धती तसेच विविध शासकीय नोंदवही, रजिस्टर, रेकॉर्ड बुक्स व इतर दप्तर अद्ययावत ठेवण्यात आले आहे की नाही, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. आवश्यक नोंदी नियमित व अद्ययावत ठेवण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी अशा अचानक तपासण्या पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos