चंद्रपूर–मूल महामार्गावर दुर्मिळ चांदी अस्वलाचा अपघाती मृत्यू


विदर्भ न्यु एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्ग एनएच-९३० वरील आगडी गावाजवळील जंगल परिसरात जानाळा बिट कक्ष क्रमांक ७१४ मध्ये एका दुर्मिळ नर चांदी अस्वलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या महामार्गावर आतापर्यंत चार चांदी अस्वलांचा अपघातात मृत्यू झाल्याची नोंद असून, वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य शशांक मोहरकर हे या मार्गाने जात असताना त्यांना रस्त्यालगत चांदी अस्वल मृतावस्थेत आढळले. त्यांनी तातडीने संस्थेचे अध्यक्ष दिनेश खाटे आणि नाजिश अली यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकर यांना घटनेची माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली.
चंद्रपूर–मूल महामार्ग हा कावल व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य यांना जोडणारा अतिसंवेदनशील वन्यजीव भ्रमणमार्ग मानला जातो. या मार्गावरून वाघ, बिबट, अस्वल, सांबर, रानडुक्कर आणि इतर वन्यप्राणी नियमितपणे स्थलांतर करत असतात.
मात्र, महामार्गावर आवश्यक वन्यजीव संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.याच महामार्गावरील केसलाघाट परिसरात ऑक्टोबर २०२५ मध्ये के मार्क या वाघिणीच्या पिल्लाचाही वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतरही वन्यजीवांसाठी कोणतीही प्रभावी उपशमन योजना राबविण्यात आलेली नाही.
हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने या मार्गावरील वन्यजीवांच्या अपघाती मृत्यूंची सातत्याने नोंद ठेवून संबंधित विभागांना वारंवार निवेदने दिली आहेत. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, धानोरा मुख्यालय चंद्रपूर यांनी २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात फॉरेस्ट प्री-कन्स्ट्रक्शन अॅक्टिव्हिटी अंतर्गत वन्यजीवांसाठी उपशमन उपाययोजनांचा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे लेखी उत्तर दिले होते. मात्र, २०२६ चे अर्धे वर्ष उलटूनही प्रस्तावावर कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नसल्याने वन्यजीवांचे अपघाती मृत्यू सुरूच असल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, नाजिश अली, इमरान खान तसेच चिचपल्ली वनक्षेत्राचे वनरक्षक अनिल नालमवाड, वनमजूर विकास निकोडे आणि शंभू मडावी उपस्थित होते. या घटनेनंतर वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर–मूल महामार्गावर तातडीने उपशमन उपाययोजना राबविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




