समाजकार्यातील अथक परिश्रमांना राष्ट्रीय गौरव : कुंदन खोब्रागडे भारत सेवा पुरस्कार २०२६ चे मानकरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तरुण सामाजिक कार्यकर्ते कुंदन सतीश खोब्रागडे यांना प्रतिष्ठेचा भारत सेवा पुरस्कार २०२६ (Exclusive National Award) प्रदान करून त्यांच्या सामाजिक योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी, मानवतावादी दृष्टिकोन आणि गरजूंप्रती असलेल्या निःस्वार्थ सेवाभावाची दखल घेत जिवरन फाउंडेशन, प्रयागराज यांच्या वतीने रविवार, ५ जुलै २०२६ रोजी हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जिवरन फाउंडेशनतर्फे हा राष्ट्रीय सन्मान प्रदान केला जातो. समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहून अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या कुंदन खोब्रागडे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
कुंदन खोब्रागडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गिरगाव गावचे रहिवासी असून, शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने सध्या चंद्रपूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. त्यानंतर पदवी व पदव्युत्तर शिक्षण चंद्रपूर येथे पूर्ण केले. तसेच समाजकार्याचे व्यावसायिक शिक्षण स्व. सुशीला रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली (चंद्रपूर) येथून पूर्ण करून समाजसेवेचा मार्ग स्वीकारला.
समाजकार्याची आवड आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी विविध सामाजिक संस्थांमधून काम केले. वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न करताना त्यांनी क्रिया फाउंडेशन, गिरगाव (जिल्हा चंद्रपूर) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक, जनजागृती तसेच विविध लोककल्याणकारी उपक्रम राबवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य ते करीत आहेत.
कुंदन खोब्रागडे यांच्या कार्यामुळे समाजातील अनेक युवकांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली असून, सामाजिक जबाबदारीची भावना अधिक बळकट झाली आहे. नेतृत्वगुण, सहानुभूती, प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थ सेवाभाव या गुणांमुळे त्यांनी सामाजिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भारत सेवा पुरस्कार २०२६ या राष्ट्रीय सन्मानामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्राचा गौरव वाढला असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि प्रशासकीय स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कुंदन खोब्रागडे यांना प्राप्त झालेला हा राष्ट्रीय सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून, समाजहितासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक समाजसेवकासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
News - Chandrapur




Petrol Price




