घराच्या हिस्स्याच्या वादातून दिराचा वहिनीवर सत्तूरने जीवघेणा हल्ला : आरोपी फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील समाधी वॉर्ड परिसरात घराच्या हिस्स्याच्या जुन्या वादातून ६० वर्षीय महिलेवर तिच्याच लहान दिराने लोखंडी सत्तूरने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी ६ जुलै रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी झालेल्या महिलेचे नाव लता चंद्रशेखर हजारे ६० वर्षे, रा. समाधी वॉर्ड, चंद्रपूर असे आहे. गोकुळ नावाच्या घरात कुटुंबातील आठ सदस्यांचे हिस्से असून त्यांचा लहान दिर राजेंद्र कृष्णाराव हजारे हा पहिल्या मजल्यावर राहतो. घराच्या मालकीच्या वादातून तो अनेक वर्षांपासून त्यांना घर सोडण्यास भाग पाडत होता. यापूर्वी २०१६ मध्येही त्याने त्या महिलेला मारहाण केले होते.
सोमवारी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास लता हजारे या घरातील स्वयंपाकघरात डायनिंग टेबलवर वर्तमानपत्र वाचत असताना आरोपी राजेंद्र हजारे हा जिन्यावरून खाली आला. जुन्या वादाचा राग मनात धरून त्याने हातातील लोखंडी सत्तूरने त्यांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. जीव वाचविण्यासाठी त्या घराबाहेर धावत आल्या. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांच्या डोक्यावरील रक्तस्त्राव थांबविण्यासाठी कापड बांधले आणि ऑटो रिक्षाने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र कृष्णाराव हजारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यापासून आरोपी फरार असून त्याचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




