चंद्रपूर शहरातील भंगार व तांब्याच्या तार चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, १.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंगार व तांब्याच्या तार चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत दोन आरोपींना आज २८ जून रोजी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारा, लोखंडी साहित्य तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने असा एकूण १ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून १२ किलो जाडलेली तांब्याची तार, ५ किलो इतर लोखंडी साहित्य, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. एमएच ३४ बीसी १२५६) आणि मोपेड (क्र. एमएच ३४ बीएम ३६८५) जप्त करण्यात आली.
या कारवाईमुळे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील अपराध क्रमांक ७२६/२०२५, कलम ३३१(२), ३०५ भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत नोंद असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी चंद्रपूर शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, संतोष निंभोरकर, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, सुनील आत्राम, पोलीस अंमलदार हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार यांनी सहभाग घेतला.
News - Chandrapur




Petrol Price




