मुंबई स्टॉक एक्सचेंजसमोरील स्वर्गीय बाबूजींचा पुतळा त्यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


- स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमत समूहाचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
विदर्भ न्यूज एकंप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतीक आणि जागतिक स्तरावर ओळख असलेल्या मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई) समोर स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार, लोकमत समूहाचे संस्थापक तथा माजी मंत्री स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई स्टॉक एक्सचेंज हे देशभरातील लाखो नागरिकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. अशा ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित ठिकाणी स्वर्गीय बाबूजींचा पुतळा उभारला जाणे, हा त्यांच्या राष्ट्रसेवा, समाजकारण, पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय कार्याचा सर्वोच्च गौरव आहे.
या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव करताना सांगितले की, बाबूजी हे केवळ राजकारणी किंवा पत्रकार नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्त स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात त्यांनी युवकांना संघटित करून ब्रिटिश राजवटीविरोधातील आंदोलनांना बळ दिले आणि स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देताना त्यांना कारावासही भोगावा लागला. त्यांच्या त्याग, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा आजही समाजाला मार्गदर्शक ठरत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यवतमाळमधील शालेय जीवनापासूनच बाबूजींनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांच्या राष्ट्रवादी विचारांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर खोल प्रभाव पडला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी लोकसेवा, समाजकारण आणि विकासाला आपल्या आयुष्याचे ध्येय मानले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबूजींच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्याचाही विशेष उल्लेख केला. महाराष्ट्र शासनात मंत्री म्हणून कार्य करताना त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडली. त्यांच्या निर्णयक्षम नेतृत्वामुळे आणि दूरदृष्टीमुळे अनेक विभागांमध्ये विकासाला चालना मिळाली. त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा आजही प्रशासन आणि संबंधित विभागांमध्ये जाणवत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही नवे पर्व सुरू केले. मराठी पत्रकारितेला नवी दिशा देत त्यांनी लोकमत या वृत्तपत्राची स्थापना केली. आज लोकमत हा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील अग्रगण्य मराठी वृत्तसमूह म्हणून ओळखला जातो. मुद्रित माध्यम, डिजिटल प्लॅटफॉर्म, दूरचित्रवाणी आणि विविध प्रसारमाध्यमांमधील लोकमतचा व्यापक विस्तार हा बाबूजींच्या दूरदृष्टी, पत्रकारितेतील मूल्यनिष्ठा आणि लोकाभिमुख विचारसरणीचे फलित असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी, राजकीय नेतृत्व आणि पत्रकारितेतील भरीव योगदानाचा गौरव केला. मुंबई स्टॉक एक्सचेंजसारख्या देशाच्या आर्थिक केंद्रस्थानी त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला जाणे ही केवळ त्यांना वाहिलेली आदरांजली नसून भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारी ऐतिहासिक घटना असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
मुंबई स्टॉक एक्सचेंजसमोरील स्वर्गीय बाबूजींचा अर्धाकृती पुतळा त्यांच्या राष्ट्रसेवा, लोकहितवादी नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेची कायमस्वरूपी आठवण जपणारा स्मारक ठरणार असून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे हे एक महत्त्वपूर्ण प्रतीक म्हणून ओळखले जाईल.
News - Rajy




Petrol Price




