महत्वाच्या बातम्या

 भामरागडमध्ये समाजबंधचे तीन दिवसीय उन्हाळी शिबिर उत्साहात संपन्न : विद्यार्थ्यांनी नाट्य सादरीकरणातून दिला सामाजिक संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड येथील सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समाजबंध संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय उन्हाळी शिबिर मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. स्थानिक गटसाधन केंद्र येथे २२ ते २४ जून या कालावधीत झालेल्या या शिबिरात परिसरातील एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधणे आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य दिशा देणे हा होता. त्यासाठी विविध नाविन्यपूर्ण व संवादात्मक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भावना समजून घेणे, नेतृत्व विकास, अभिनय कौशल्य, समता, सुरक्षित स्पर्श, लैंगिक शिक्षण, मैत्री-प्रेम-आकर्षण तसेच संघभावना (टीमवर्क) यांसारख्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण विषयांवर खेळ, गाणी, नाट्यकला आणि गट उपक्रमांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना नाट्यनिर्मितीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः सामाजिक विषय निवडून त्यावर आधारित प्रभावी नाट्य सादरीकरण केले. यामध्ये व्यसनमुक्ती, सामाजिक सलोखा, मासिक पाळीतील भेदभाव आणि शिक्षक-विद्यार्थी संवाद यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर नाट्यरूपातून समाजजागृती करण्यात आली. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी समाजाला सकारात्मक आणि विचारप्रवृत्त करणारा संदेश दिला.

याशिवाय गावातील विविध सामाजिक समस्या व प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनाद्वारे गट सादरीकरणही केले. खेळ, गाणी, माहितीपर लघुपट (शॉर्टफिल्म) आणि प्रत्यक्ष सहभागावर आधारित उपक्रमांमुळे संपूर्ण शिबिर अत्यंत आनंददायी व शिक्षणमय वातावरणात पार पडले.

या शिबिराचे समन्वयन ऋतुजा व प्रथमेश यांनी केले, तर नियोजनाची जबाबदारी हेमा, ममता, अश्विनी व स्वप्नश्रुती यांनी यशस्वीपणे सांभाळली. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कलागुणांचे आणि सामाजिक जाणिवांचे भामरागड परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos