जिल्हा परिषदेत एकल महिला दिन उत्साहात : सक्षमीकरणासाठी विविध योजनांची माहिती


- एकल महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे : मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने २३ जून २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात ‘एकल महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, हक्क, सुविधा आणि कायदेशीर संरक्षणाबाबत जनजागृती करणे तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहन देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण), जिल्हा परिषद गडचिरोली यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात एकल महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांनी महिला व बाल विकास विभागामार्फत एकल महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. स्वावलंबन, कौशल्य विकास, आर्थिक सहाय्य, आरोग्य व पोषण सेवा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या सहाय्यक न्यायरक्षक ॲड. एस. ए. मेश्राम, विधी सल्लागार सारिका वंजारी तसेच कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एकल महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांविषयी, शासकीय योजनांविषयी, महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांविषयी तसेच कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा (POSH Act) याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, आरमोरी आणि गडचिरोली (शहरी) क्षेत्रातील २५ एकल महिला, ३० अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित एकल महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून त्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज व्यक्त केली. एकल महिलांनीही उपलब्ध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर बनावे आणि समाजात आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमामुळे एकल महिलांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळाले, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण), जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिली.
News - Gadchiroli




Petrol Price




