महत्वाच्या बातम्या

 पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या बालिकेचा शोध : आरोपीसह वर्ध्यातून ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा पोलिसांच्या ऑपरेशन शोध-४ मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष (AHTU) आणि सायबर सेलच्या संयुक्त पथकाने पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका बालिकेचा यशस्वी शोध घेत आरोपीसह तिला वर्धा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात अपहरण व मानव तस्करीसंदर्भात गुन्हा क्रमांक १०६४/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ व ३७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी संशयिताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान संबंधित मोबाईल क्रमांक वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर परिसरात कार्यरत असल्याचे आढळून आले.

यानंतर प्राप्त कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि इतर तांत्रिक माहितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले. त्यातून पीडित बालिका आणि संशयित आरोपी लक्ष्मण कवडू श्रीरामे (वय ३०), रा. चिंचोली, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर  हे वर्धा जिल्ह्यात लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करून एलसीबी, एएचटीयू व सायबर सेलच्या पथकाने तातडीने समुद्रपूर येथे धाड टाकली. १९ जून रोजी आरोपी व पीडित बालिकेला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी दोघांनाही रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या संवेदनशील प्रकरणाचा उलगडा झाला असून, चंद्रपूर पोलिसांच्या ऑपरेशन शोध-४ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

सदर मोहिम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रेडवार, सहायक पोलीस निरीक्षक हिवसे,  पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस हवालदार प्रमोद कोटणाके, मिलिंद टेकाम, नितीन साळवे, उषा लेंडागे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos