नांदेड रेती घाटावर पोलिसांची धडक कारवाई : ७.५६ लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त, चालकावर गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / लाखांदूर : तालुक्यातील नांदेड येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीवर लाखांदूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वी धाड टाकली. या कारवाईत विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह एकूण ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ट्रॅक्टर चालक विठ्ठल तिमाजी साठवणे (५२, रा. नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाखांदूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दिगंबर तलमले, शिपाई आकाश सोनुने आणि किशोर टेकाम हे रात्रीच्या सुमारास गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना नांदेड रेती घाटावरून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर यांना दिली. माहिती मिळताच पोलीस पथकाने नांदेड येथील शिवाजी टी-पॉइंटजवळ सापळा रचला. काही वेळातच एक संशयास्पद ट्रॅक्टर येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली.
या तपासणी दरम्यान ट्रॅक्टरच्या (क्र. एमएच ३६ एल ५९२२) ट्रॉलीमध्ये अंदाजे १ ब्रास अवैध रेती आढळून आली. पोलीस पथकाने ट्रॅक्टरचालक विठ्ठल साठवणे याला रेतीच्या वाहतुकीबाबत रॉयल्टी व वैध कागदपत्रांची मागणी केली असता, त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे त्याने कबूल केले.
पोलिसांनी १ ब्रास रेती, ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरमोरी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.
News - Bhandara




Petrol Price




