ओतूर येथे भीषण अपघात : वडील व ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : नगर–कल्याण महामार्गावरील ओतूर येथील निमंत्रण हॉटेलजवळ रविवारी (२१) दुपारी सुमारे १२.१६ वाजता भीषण अपघात घडला. मोटारसायकल आणि आयशर ट्रक यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या जोरदार धडकेत वडील आणि त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथून कल्याणच्या दिशेने जाणारी एमएच १७ डीडी ३२१५ क्रमांकाची मोटारसायकल आणि कल्याणहून आळेफाट्याकडे येणारा एमएच ०४ एमआर ८८६७ क्रमांकाचा आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील पाचही प्रवासी रस्त्यावर दूरवर फेकले गेले. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यातून धडकेचा थरार स्पष्ट दिसतो.
या दुर्घटनेत अजय बबन दुधवडे (वय २१) आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी अनुजा अजय दुधवडे (रा. माळवंदवाडी, घारगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून ॲम्ब्युलन्सद्वारे ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
या अपघातात सलोनी अजय दुधवडे, तनुजा अजय दुधवडे (रा. माळवंदवाडी, घारगाव) आणि सुदर्शन गौतम केदार (रा. पांगरीमाथा, ता. जुन्नर) हे तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी रस्त्यावरची वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील अपघातांची समस्या पुन्हा एकदा गंभीर चर्चेचा विषय ठरली आहे.
News - Rajy




Petrol Price




