जारावंडी येथे गडचिरोली पोलीस व मेघे रुग्णालयाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर : १०० नागरिकांची तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने सातत्याने विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पोलीस दल व शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज, २१ जून रोजी मौजा जारावंडी येथील आठवडी बाजार परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करून त्यांना विविध आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. जारावंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे १०० नागरिकांची डॉ. रवींद्र इंगोले व डॉ. अभिषेक जोशी यांच्या नेतृत्वात विविध आजारांबाबत तपासणी करून त्यांना मोफत औषधे आणि पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच यातील ४६ गरजूंना पुढील उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये शिफारस करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन २०२१ पासून आजवर एकूण २०५ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून तब्बल ४३ हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
याशिवाय ६ रक्तदान शिबिरांद्वारे ४,८६४ युनिट रक्ताचे संकलन आणि ऑपरेशन रोशनी च्या माध्यमातून ९,९७१ नागरिकांची नेत्रतपासणी करून १,४१२ जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हे शिबिर पोलीस अधीक्षक एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी. जे., विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जारावंडीचे पोउपनि रोहन जावळे व पोलीस अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
News - Gadchiroli




Petrol Price




