गडचिरोलीत हवामान अनुकूल शेतीसाठी व्यापक जनजागृती मोहीम : हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जगभरात हवामान बदल हा गंभीर प्रश्न बनत असून भारतासारख्या कृषीप्रधान देशात त्याचे परिणाम शेती क्षेत्रावर अधिक तीव्रतेने जाणवत आहेत. २०२६-२०२७ हे वर्ष अल निनो प्रभावाचे असल्याने कमी पाऊस, तसेच पावसात खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या आधुनिक शेती पद्धतींचे प्रशिक्षण देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.
ही मोहीम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत २० एप्रिल २०२६ ते ३० मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण ७४ हजार ९९५ शेतकरी सहभागी झाले असून त्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञान, जोखीम व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी पद्धतींबाबत मार्गदर्शन देण्यात आले.
या उपक्रमाद्वारे वैयक्तिक लाभ योजनांसोबतच शेतकऱ्यांना ज्ञानरूपी संजीवनी स्वरूपात हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. मोहिमेदरम्यान बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया तसेच सापळा पिकांची लागवड यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रात्यक्षिके आणि जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात आले.
राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आभासी प्रणालीद्वारे डिजिटल शेतीशाळांचेही आयोजन करण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे कार्य करण्यात आले.
या सर्व उपक्रमांना तांत्रिक आधार देण्यासाठी कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार AI हे डिजिटल प्लॅटफॉर्म महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकावरील कीड व्यवस्थापन, स्थानिक हवामान अंदाज तसेच पेरणी व कापणीचे योग्य नियोजन याबाबत उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली जाते.
याशिवाय शेतकऱ्यांपर्यंत नवीन कृषी तंत्रज्ञान पोहोचविणे, निविष्ठांचा खर्च कमी करणे आणि लोकसहभागातून मृद व जल व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध मोहिमा राबविल्या जातात. खरीप हंगाम २०२६-२०२७ अंतर्गत विविध गावांमध्ये प्रचार व प्रसिद्धी मोहिमा मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहेत.
एप्रिल ते जून २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ४ हजार ७७४ कृषी विस्तार मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या असून या सर्व मोहिमांची नोंद महाकृषी ॲप वर करण्यात आली आहे.
आगामी खरीप हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांनी या मोहिमांमध्ये सहभागी होऊन हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करावा तसेच महाविस्तार AI अँप डाउनलोड करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




