चोरीच्या संशयातून वैद्यकीय अधिकाऱ्याला बॉम्बने उडविण्याची धमकी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला एक लाख रुपयांच्या कथित चोरीच्या प्रकरणातून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची तसेच बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरपना पोलिसांनी संबंधित फर्निचर कारागिराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
डॉ. आकाश रामदास जिवने (वय ४३), वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय कोरपना यांच्या नवीन घरातील फर्निचरचे काम करण्यासाठी चंद्रपूर येथील आर्किटेक्चर इंजिनिअर धिरज वासनिक यांना कंत्राट देण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून राजू अर्जुन विश्वकर्मा हा कारागीर मागील दोन महिन्यांपासून डॉ. जिवने यांच्या घरात राहून फर्निचरचे काम करत होता.
२५ जुलै रोजी इंजिनिअर धिरज वासनिक यांना देण्यासाठी डॉ. जिवने यांनी घरातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये एक लाख रुपये ठेवले होते. हे पैसे धिरज वासनिक यांना देण्याची जबाबदारी त्यांनी राजू विश्वकर्मा याच्यावर सोपवून ते आपल्या शासकीय कामासाठी ग्रामीण रुग्णालयात गेले. मात्र काही वेळाने घरी परतल्यानंतर ड्रॉवरमधील पैसे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत धिरज वासनिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर राजू विश्वकर्मा याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याने डॉ. जिवने यांनी पोलिसांकडे चोरीची तक्रार दिली होती.
या प्रकरणाची चौकशी सुरू असताना पोलिसांनी धिरज वासनिक व राजू विश्वकर्मा यांना पोलीस ठाण्यात बोलावले. त्यावेळी चोरीचा आरोप केल्याच्या रागातून राजू विश्वकर्माने डॉ. जिवने यांना अश्लील शिवीगाळ करत कापून टाकीन तसेच बॉम्बने उडवून देईन अशी धमकी दिली. त्यावेळी इंजिनिअर धिरज वासनिक यांनी मध्यस्थी करून वाद शांत केले.
त्यानंतर राजू विश्वकर्मा दुसऱ्या दिवशी कोणालाही न सांगता तेथून निघून गेला. काही तासांनी त्याने मोबाईलवर व्हॉईस मेसेज पाठवत पुन्हा अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. चोरीचा आरोप केल्याचा संताप व्यक्त करत डॉ. जिवने यांना जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच त्यांची नोकरी घालवून देण्याची धमकी दिली.
या गंभीर तक्रारीच्या आधारे कोरपना पोलिसांनी राजू अर्जुन विश्वकर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून धमकी, शिवीगाळ आणि कथित चोरीच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश वाकुलकर करीत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




