धानोरा येथे मक्का खरेदी बंद होण्याची शक्यता टळली : आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : धानोरा येथील स्थानिक धान्य गोदाम पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे उद्यापासून मक्का खरेदी बंद ठेवण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही माहिती धानोऱ्याच्या दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनीद्वारे मिळताच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून धानोरा येथील गोदामाला प्रत्यक्ष भेट दिली.
यावेळी त्यांनी गोदामाची पाहणी करून मक्का खरेदी प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच त्यांच्या मालाची वेळेवर खरेदी व्हावी यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
आमदार डॉ. नरोटे यांच्या पाठपुराव्यानंतर तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत मेंढा येथील गोदाम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मक्का खरेदी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या मालाची खरेदी अखंडित सुरू राहावी यासाठी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिली.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते अनंतजी साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, जिल्हा सचिव सारंगजी साळवे, नगरसेवक गटनेते संजयजी कुंडू, राकेशजी खरवडे, सुभाषजी खोबरे, विजयजी गेडाम, भाजयुमो तालुकाध्यक्ष सौरभजी सहारे तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




