अवैध दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड : ४ ग्राहकांसह मालकाविरुद्ध गुन्हा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने ताडोबा रोडवरील कोयना गेट परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व दारू सेवन अड्ड्यावर शनिवारी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत ४ ग्राहकांसह अड्डा चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे २१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभारलेल्या अस्थायी टिनाच्या झोपडीत कोणतीही परवानगी नसताना दारूविक्री केली जात होती. तसेच ग्राहकांना तेथेच दारू सेवन करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून दिले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान मुकेश मधुकर रामटेके, विकास विठोबा किरमीरे, राजेश चंद्रकांत वाघ आणि अंबादास नानाजी थेरे हे चौघे प्रत्यक्ष मद्यपान करताना आढळून आले. तसेच आशिष नत्थुजी खोब्रागडे हा ग्राहकांना दारू सेवन साठी आवश्यक सुविधा पुरवित असल्याचे समोर आले.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५, ६८ आणि ८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवालात त्यांनी मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या कारवाईत देशी दारूच्या २०० सीलबंद बाटल्या, विविध प्रकारच्या व्हिस्कीच्या २९ बाटल्या असा एकूण १५ हजार २७० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय काउंटरवरील २ हजार ७५० रुपयांची रोख रक्कम आणि इतर साहित्य मिळून एकूण २१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक दत्तात्रय वरठी, दुय्यम निरीक्षक प्रमोद राजोते, सचिन पोलेवार, सोमेश्वर गव्हारे तसेच जवान जगदीश मस्के, अमोल भोयर, रामचंद्र अम्मावार, संजयकुमार हरीनखेडे, सुजित चिकाटे, महिला जवान सुकेशनी कारेकर, विलास महाकुलकर यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




