महत्वाच्या बातम्या

 विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल : नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेकपोस्ट परिसरातील नो फ्लायिंग झोनमध्ये विनापरवानगी ड्रोन उडविल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेदरम्यान काही नागरिकांनी संबंधित तिघांना डांबून ठेवल्याची बाब समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मुधोली चेकपोस्ट परिसरात ड्रोन उडविले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता संबंधितांकडे ड्रोन उडविण्यासाठी आवश्यक असलेली वैध परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शिवम कळोळे, सचिन विश्वकर्मा आणि प्रवीण पोटेवार यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिली.

दरम्यान, या घटनेनंतर काही नागरिकांनी संबंधित तिघांना स्वतःच्या ताब्यात ठेवून डांबून ठेवल्याची घटना घडली. यावर जिल्हा प्रशासनाने गंभीर भूमिका घेत नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात न घेण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, चामोर्शी परिसरातील भूमी संपादन प्रक्रियेला सध्या दोन महिन्यांची स्थगिती देण्यात आली असून, त्या संदर्भात कोणतीही प्रशासकीय कार्यवाही सुरू नाही. त्यामुळे अफवा, अपप्रचार किंवा गैरसमजांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही प्रशासनासह प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, कोणत्याही प्रकारे शांतता भंग करण्याचा किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्धही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने नागरिकांना संयम बाळगण्याचे, कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास ती त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचे आणि कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos